यावल, प्रतिनिधी| तांदुळाने भरलेला ट्रक काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची गुप्त माहिती मिळताच यावल पोलिसांनी ट्रकची झाडाझडती करून ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.
याबाबत वृत्त असे की, तांदुळाने भरलेला ट्रक काळ्या बाजारात विक्रीसाठी चोपडा मार्गाने येत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. त्यावर सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, सुशील घुगे, रोहिल गणेश, राजेश वाढे या पथकाने चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्राल पंपा जवळ ट्रक (क्र. एम. एच. १८ ए.सी. ०८१७) पकडला. यावेळी पोलिसांनी ट्रकसह चालक केदार मुरलीधर गुजर व शिवराम सोमा कोळी दोघे रा. शिरपूर यांना ताब्यात घेतले. दरम्यान जप्त केलेला ३० टन माल रेशनिंगचा आहे का? या संदर्भात कारवाई करीता तांदुळाचे नमुने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. मात्र दोन दिवस उलटूनही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या बाबत स्पष्टता दिली नसल्याचे पोलिसांनी सांगीतले आहे. दरम्यान सदर तांदूळ हे कदाचित रेशनिंगचा असून तो चोपडा येथुन गोंदिया येथे ट्रकव्दारे नेला जात असावा संशय पोलिसांनी घेतला आहे. मात्र तपासाअंती काय निष्पन्न होणार याकडे लक्ष लागले आहे.