भडगाव प्रतिनिधी । अपघातग्रस्तांना मदत करून त्यांचे प्राण वाचविणाऱ्याना शासनातर्फे जीवनदूत पुरस्कार देवून गौरविण्यात येत असते. यावर्षीचा जिल्हास्तरीय जीवनदूत पुरस्कार भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार तृप्ती धोडमिसे यांना जाहीर झाला असून त्यांना लवकरच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी अनेक वेळा नागरीक बघ्याची भूमिका घेतात. त्यात अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव धोक्यात येतो. अशा व्यक्तींना तातडीने दवाखान्यात दाखल करुन त्यांना उपचार मिळावे, जेणे करुन त्यांचा जीव वाचण्यास मदत होईल यासाठी शासनाने जीवनदूत पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार वर्षीचा जिल्हास्तरीय जीवनदूत पुरस्कार भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार तृप्ती धोडमिसे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
तृप्ती धोडमिसे या भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून मागील महिन्यात रुजू होण्यासाठी जात असताना भडगाव येथे एक आजीचा अपघात झाला होता. श्रीमती धोडमिसे यांनी तातडीने त्यांना आपल्या वाहनात बसवून दवाखान्यात दाखल केले होते. शिवाय दवाखान्यात त्यांचेवर योग्य ते उपचार तातडीने मिळावेत यासाठी डॉक्टरांकडे पाठपुरावा केला होता. श्रीमती धोडमिसे यांनी आजींना तातडीने उपाचारासाठी दाखल करुन त्यांचा जीव वाचविल्याने त्यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय जीवनदूत पुरस्कार घोषित करण्यात आला. गुरुवार २८ जानेवारी रोजी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत असल्याने श्रीमती धोडमिसे या हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकल्या नाही. नंतर त्यांना हा पुरस्कार यथोचित प्रदान करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.