तलाठ्यांवर हल्ला करणार्‍यांची कारागृहात रवानगी

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील भरवसजवळ महसूल पथकावर हल्ला करणार्‍या चौघांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी तालुक्यातील भरवस येथील पांझरा नदीतून अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांनी चार तलाठ्यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल आहे. त्यातील चौघांनी मारवड पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. गुन्ह्यातील ट्रॅक्टर मालक मुख्य आरोपी बबलू राजेंद्र तायडे उर्फ भूषण सुनील माळी याला पहिल्यांदा अटक करण्यात आली. मग त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राकेश भगवान वडर, गिरीश उर्फ बाळा जयवंतराव पाटील यांना व नंतर भिलाटीतून ट्रॅक्टर चालक मुकेश आनंदा भील (सर्व रा.बेटावद, ता.शिंदखेडा, जि.धुळे) यांना अटक करण्यात आली. या चारही आरोपींना न्यायाधीश सुषमा अग्रवाल यांनी तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्याने सर्व आरोपींना एपीआय राहुल फुला यांनी अमळनेर न्यायालयात हजर केले. येथे त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. यानंतर आरोपींना जळगाव येथील जिल्हा कारागृहात हलवण्यात आले. या प्रकरणातील अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Protected Content