सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपण पैसे खाल्ले असे कोणी म्हणले तर देवाशप्पथ सांगतो मिशा काय भुवया काढून टाकेन परत तोंड दाखवणार नाही. त्यामुळे समोरा-समोर या आणि दाखवून द्या’, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना दिला आहे.
उदयन राजे आणि शिवेंद्र राजे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आता या दोन्ही मान्यवरांमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. अलीकडेच आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे अध्यक्ष असलेल्या सातारा विकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या आरोपांना उत्तर देताना उदयनराजे यांनी जोरदार पलटवार केला आहे.
या संदर्भात उदयनराजे म्हणाले, तुम्ही दिवस वार आणि वेळ ठरवून समोरासमोर या. मी जर भ्रष्टाचार केला असेल तर समोर येऊन दाखवा. आम्ही जर भ्रष्टाचार केला असता तर सातारा शहरात एवढी विकास कामे झाली नसती. द्या लोकांमध्ये माईक आणि सांगू द्या. विरोधकांच्या मनात, हृदयात,वस्तुस्थितीत जर भ्रष्टाचारच आहे त्यांना उत्तर देणे मी उचित समजत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ज्यावेळेस विरोधकांच्या हातात नगरपालिका पालकमंत्री पद आमदारकी या आधी असूनदेखील सातारकरांचा विकास का झाला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्यावेळेस तुमच्या हाती सत्ता होती त्यावेळेस का विकास कामे झाली नाहीत. आमची सत्ता येण्याआधी त्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळेच सातारा शहरातील विकास कामे रखडल्याचा आरोप त्यांनी केला.