मुंबई : वृत्तसंस्था । आता कंगनानं ट्विट करत सचिन वाझे यांच्या अटकेवर भाष्य केलं आहे. ट्विटमध्ये कंगनाने या गुन्ह्यातील सत्य बाहेर आले तर ठाकरे सरकार पडेल, असे वक्तव्य केले आहे
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. .
एनआयएने सांगितल्यानुसार, आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत वाझे यांना अटक करण्यात आली आहे.
मुकेश अंबानींच्या अँटिलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या गुन्ह्यात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली. एनआयएने सचिन वाझे यांनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवली, असा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. यावेळी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल. त्यामुळे आता पोलीस कोठडीतील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहे.