जळगाव, प्रतिनिधी । तीस वर्षात कोणी कोणी शेण खाल्लं याची माहिती आम्ही घेत आहोत आणि याचा सर्व लेखा जोखा महासभेत किंवा माध्यमांसमोर आणून पोलखोल करणार असून सेनेचे कोणत्याही नगरसेवकावर भ्रष्टाचार सिध्द झाल्यास त्याच क्षणी त्या नगरसेवकाचा राजीनामा घेऊ अशी ग्वाही विरोधीपक्षनेते सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी शिवसेनेचे महानगर अध्यक्ष शरद तायडे, गटनेते अनंत जोशी, नगरसेवक नितीन बरडे आदी उपस्थित होते. भाजप गटनेते भगत बालाणी व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी पत्रकर परिषद घेऊन सेना नगरसेवकांवर आरोप केले होते. या आरोपांना प्रतीउत्तर म्हणून ही पत्रकार परिषद शिवसेना कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाजन आ. भोळेंवर आरोप करत असल्याचे बालाणी म्हणाले होते याला उत्तर देतांना आ. भोळे यांना निवडून आणण्यासाठी सेनेनेच मदत केली आहे हे विसरले का? असा महाजन यांनी प्रश्न उपस्थित केला. आमदार म्हणतात अधिकारी आमचे ऐकत नाहीत, जर ६१ आमदार भाजपचे असतांना अधिकारी आमदारांचे ऐकत नसतील तर आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सुनील महाजन यांनी केली. तसेच वॉटरग्रेस कंपनीच्या मक्तेदाराची फाईल एका भाजप नगरसेविकेच्या पतीनेच फिरवली असल्याचा आरोपही सेनेकडून करण्यात आला आहे. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आपल्या पदाचा व नेत्यांची पॉवर वापरुन मनपाच्या १५ व्या मजल्यावरील प्रकरणातील दोषींची ईडी व सीबीआयमार्फत चौकशी करावी असे आवाहन महाजन यांनी यावेळी दिले. महाजन पुढे म्हणाले की, शहराच्या विकासासाठी आणि चुकीचे घडत असेल तर आम्ही विरोधाची भूमिका घेवू. सत्तेत आल्यानंतर सहनशिलता आणि संयम ठेवला पाहिजे. परंतु, संयम विसरले म्हणून त्यांना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच माजी मंत्री एकनाथराव खडसेंची भेट घेऊन तीस वर्षात कोणी शेण खांल्ल यांची माहिती घेणार असून दूध का दूध पाणी पाणी करणार आहोत, असेही महाजन यांनी जाहीर केले. भगत बालाणी यांनी विरोधकांचे प्रशासनाशी लागेबांधे असल्याचा केलेल्या आरोपाला प्रतिउत्तर देतांना महानज म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी नगररचना विभागाचे आवक जावक रजिस्टर कोणी ताब्यात घेतले होते हे सर्वांना माहिती असल्याचेही सांगितले. दरम्यान, मेहरुणच्या महाजनांच्या नादी लागले तर, महाजनकी दाखवू, असा इशाराही सुनील महाजन यांनी भाजपला दिला आहे. घरकुल प्रकरणामुळे भाजपने मनपा सभागृहातील सुरेशदादा जैन यांचा फोटो काढून टाकला. त्याच घरकुल प्रकरणात भगत बालाणी यांनादेखील शिक्षा सुनावण्यात आली आहे. मग त्यांनीदेखील नैतिकता पाळून स्वत:हुन राजीनामा दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. भगत बालाणी म्हणजे बिनबुडाचा लोटा असून त्यांनी पाणपोईला आधी स्व. निखील खडसे यांचे नाव दिले नंतर त्याच पाणपोईचे नाव बदलून दुसऱ्यांचे नाव दिले, असा आरोप सेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे यांनी केला. २५ वर्षांपूर्वी मेहरुणमध्ये टपरी चालविणारे भगत बालाणींचे आज रिसोर्ट आणि लॉन्स कसे झाले हे आम्हाला बोलायला लावू नका, त्यांनी २५ वर्षांत शहरासाठी काय केले ते दाखवावे, असे आव्हान अनंत जोशी यांनी दिले. बालाणी यांनी २५ वर्षात इकडे तिकडे उड्या मारुन सत्ता भोगली, वॉटरगे्रस कंपनीत भाजपच्याच ३ नगरसेवकांनी पैसे गुंतविले होते आणि नंतर बालाणींच्या सांगण्यावरुन त्यांनी मक्तेदाराकडून पैसे परत घेतल्याचा आरोपही अनंत जोशी यांनी यावेळी केला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/213048423380598/