चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील तरवाडे येथे अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून देशी-विदेशी दारूच्या एकूण ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव ग्रामीण पोलीस हे सकाळी वाघळी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना सुत्रांकडून तालुक्यातील तरवाडे पेठ येथील बसस्थानक जवळ देशी-विदेशी दारू हे अवैध विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावर सहा. पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार व पोकॉ बिभीषण सांगळे यांनी सदर ठिकाण गाठून सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी देशी – विदेशी दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. एकूण ११ हजार ९७० रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याला जप्त करण्यात आले आहे. यावेळी संजय महादु चौधरी (वय- ५१ रा. तरवाडे पेठ ता. चाळीसगाव ) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईमुळे ग्रामीण पोलीसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार व पोकॉ बिभीषण सांगळे आदींनी केली आहे. पोलिस कॉन्स्टेबल निवृत्ती हिंमत चित्ते यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.