पुणे (वृत्तसंस्था) तबलिगी जमातने बेजबाबदार वर्तन केले आहे. मुस्लिम समाजातही तबलिगींच्या वर्तनाबद्दल असंतोष आहे. त्यामुळे ‘तबलिगी जमात’ने सर्व भारतीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी केली आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने एक पत्रक काढून तबलिगी जमातवर जोरदार टीका केली आहे.
तलबिगींच्या वर्तनाचे पडसाद सोशल मीडियात उमटले. धार्मिक तेढ निर्माण होईल अशा गोष्टी शेअर करण्यात आल्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुही माजवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला. तसेच, पोलीस ठाण्यात काही गुन्हेही दाखल करण्यात आले. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी ‘तबलिगींवर उपचार कसले करता? त्यांना गोळ्या घाला, लॉकडाउन संपल्यानंतर गाठ आमच्याशी आहे, अशा वक्तव्यांमुळे पुन्हा घबराट निर्माण झाली आहे. सर्वसामान्य मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल व करोनाच्या फैलावाला कारण ठरल्याबद्दल तबलिगींनी माफी मागावी, अशी मागणी देखील मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केली आहे.