कासा ( गुजरात ) : वृत्तसंस्था । देशभरामध्ये इंधनाच्या किमती आकाशाला भिडल्या असताना मुबंई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोरच्या जवळपास धाब्यावर तेल माफियांचे मोठे बस्तान आहे. अनेक धाब्यांवर इंधन चोरी आणि काळ्या बाजारात चोरीचे इंधन विक्री करणारी टोळी कार्यरत आहे.
चालकांच्या सहभागाने धाब्यावर येणाऱ्या टँकरमधून मोठ्या इंधन टाकीमधून काढले जाते. टँकरमधून डिझेल काढून ते विहिरीसारख्या सिमेंटच्या टाकीत तात्पुरते साठवले जाते. नंतर रात्र झाल्यानंतर चोरलेले इंधन प्लास्टिक टाक्यांमध्ये भरून विक्रीसाठी काळ्या बाजारात पाठवले जात आहे.
या तेल माफियांची हिम्मत वाढली असून त्या विरोधात कोणी आवाज उठवायला गेले तर त्या व्यक्तीला मारहाण धमक्या देण्यापर्यंत या माफियांची मजल जात आहे. स्थानिक पोलिसांकडून याविरुद्ध कारवाई होताना दिसत नाही.
पोलीस या इंधनचोरी करणाऱ्यांच्या विरोधात छोटी-मोठी कारवाई करतात. परंतु मुख्य सूत्रधार अटक होत नसल्याने पोलिसांनी पाठ फिरवल्यावर पुन्हा ऑइल माफियांचे धंदे सुरू होतात.
या ऑइल माफियांना चोरी करताना अनेक वेळा आम्ही पाहिले आहे, या विरोधात पोलिसांनादेखील अवगत केले आहे, परंतु मुख्य आरोपीला अटक होत नाही, या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहोत. असे जगदीश धोडी ( माजी उपाध्यक्ष, कोकण पाटबंधारे प्रकल्प ) यांनी सांगितले
तेल माफियांवर आम्ही एकदा कारवाई केली होती, आताही रात्रीची गस्त चालू आहे, असे प्रकार सापडल्यास कडक कारवाई करण्यात येईल.असे , उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी सांगितले