जळगाव प्रतिनिधी । शहरातील ढाकेवाडी येथील प्रसन्न सराफ यांचे नंदुरबारकर सराफ नावाचे ज्वेलर्सचे दुकान फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने लांबविणाऱ्या दोन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी मुक्ताईनगरातून अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
भारतसिंग आयासिंग भाटीया (वय-१९) आणि मोनुसिंग जगदीशसिंग बावरी (वय-२२) रा. तांबापूरा असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.
सविस्तर माहिती अशी की, प्रसन्न प्रदीप सराफ रा. ढाकेवाडी जळगाव हे कुटुंबियांसह तीनमजली इमारतीत राहतात. त्यांच्या घराच्या बाहेर नंदूरबारकर सराफ नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी प्रसन्न यांनी नेहमीप्रमाणे रात्री १० वाजता दुकान बंद केले होते. मध्यरात्री अज्ञात तीन चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने सराफ दुकान फोडले. दुकानातील सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण अंदाजे ५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाला गोणीत भरून नेला होता. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ३१ नोव्हेंबर रोजी सकाळी ३.३२ वाजता चोरट्यांनी कटरने दुकानाचे दोन्ही कुलूप तोडले. त्यानंतर दोन जणांनी आत प्रवेश केला. तर एकजण बाहेर थांबलेला होता. तिघांनी डोक्यावर टोपी, हातामोजे आणि तोंडाला रूमाल बांधलेला होता. ३.४८ वाजता दुकानाच्या आत गेलेले दोन चोरट्यांनी गोणीत सोने चांदी भरून बाहेर आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे मुक्ताईनगर शहरात असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील, तसेच मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोहेकॉ अशोक जाधव, माधव गोरेवाल यांनी कारवाई करत संशयित आरोपी भारतसिंग आयासिंग भाटीया (वय-१९) आणि मोनुसिंग जगदीशसिंग बावरी (वय-२२) दोन्ही राहणार तांबापूर, जळगाव यांना शनिवार ६ नोव्हेंबर रोजी सकाळी एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. तर तिसरा संशयित आरोपी फरार झाला आहे. दोघा संशयितांना उद्या रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.