नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीन सीमारेषा वादावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्याचा दावा भारताने फेटाळून लावला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी बोललो. चीनसोबतच्या संघर्षामुळे ते सध्या चांगल्या मूडमध्ये नाहीत, अशी टिप्पणी ट्रम्प यांनी केली. परंतु गेल्या दोन महिन्यात ट्रम्प आणि मोदी यांच्यात कुठलाही संवाद झालेला नाही असे सरकारमधील सूत्रांचे म्हणणे आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्यात सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही. दोघांमध्ये 4 एप्रिल रोजी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधावर शेवटची चर्चा झाली असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. भारत-चीनमधील सीमा वादावर मध्यस्थी करण्याची तयारी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी दाखवली होती. “आम्ही भारत आणि चीन या दोन्ही देशांना याबाबत कळवले आहे. दोन्ही देशांची इच्छा असेल तर अमेरिका मध्यस्थीसाठी तयार आहे.” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत म्हटले होते.