जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ पासून गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयास मान्यता दिली आहे. नविन महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थींनीसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज अशा १४० विद्यार्थी क्षमतेच्या नुतन वसतिगृहाची वास्तुशांती व गृहप्रवेश सोहळ्याचे उद्घाटन मंगळवार दि.१४ फेब्रुवारी रोजी डॉ.केतकी पाटील व डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या शुभहस्ते झाले.
नुकतीच शासनाने डॉ.केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयास एएनएम, जीएनएम प्रवेशासाठी मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज १४० विद्यार्थी क्षमतेच्या नविन वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. राजपुरोहित डी.टी.राव यांच्यासह ब्रह्मवृंदाच्या पौराहित्याद्वारे डॉ.केतकी व डॉ.वैभव पाटील या दांम्पत्याच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्याहस्ते वसतिगृहातील विविध विभागांचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, राजपुरोहित डी.टी. राव, प्रा.एन.जी.चौधरी, प्रा.स्मिता चौधरी, गोदावरी नर्सिंग कॉलेजचे संचालक शिवानंद बिरादार, रजिस्ट्रार प्रवीण कोल्हे, नर्सिंग वस्तीगृहाच्या रेक्टर हर्षा कोल्हे, बायोमेडिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे हेड प्रा.विजय चौधरी, मेट्रन संकेत पाटील, मनीषा खरात, वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृह रेक्टर अर्चना भिरूड यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर वृंद आदि उपस्थीत होते.
गोदावरी फाऊंडेशनअंतर्गत गोदावरी नर्सिंग महाविद्यालय हे मागील २० वर्षांपासून नर्सिंग क्षेत्रासाठी विद्यार्थी घडवित आहे. त्यादृष्टीने येणार्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय परिसरात ४०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह आहे. मात्र काही वर्षात नर्सिंग अभ्यासक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता नूतन प्रवेशित विद्यार्थीनींसाठी वाढीव क्षमतेचे वसतिगृह उभारण्याचे नियोजन होते. या भव्य नुतन वास्तुमध्ये विद्यार्थींना आरामदायी वातावरण व त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली असल्याचे रेक्टर हर्षा कोल्हे यांनी सांगितले.