जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व्यसनांमुळे केवळ रूग्णच नव्हे तर संपूर्ण कुटूंबाला त्याचा त्रास होत असतो. ही एक सामाजिक समस्या आहे. या सामाजिक समस्येचे आता निराकरण करण्यासाठी संकल्प व्यसनमुक्ती केंद्र सज्ज असून हे केंद्र व्यसनांच्या आहारी गेलेल्या रूग्णांसाठी एक आशेचा किरण असल्याचे प्रतिपादन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील मानसोपचा विभागांतर्गत संकल्प व्यसनमुक्ती केंद्राचे गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, मानसोपचार विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. विलास चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुभाष बडगुजर, निवासी डॉ. गोविंद यादव, डॉ. मुजाहीद शेख, डॉ. हुमेद महाडीक, डॉ. विकास गायसमुद्रे, डॉ. आदित्य जैन, डॉ. सौरभ भुतांगे, समुपदेशक बबनराव ठाकरे, प्रा. माधुरी धांडे उपस्थित होते. डॉ. उल्हास पाटील पुढे म्हणाले की, संकल्प व्यसनमुक्ती केंद्राच्या लोगोमध्ये ३६० अंशात फिरणार्या सात व्यक्ती दाखविण्यात आल्या आहेत. या सात व्यक्ती आयुष्याकडे मोठ्या आशेने बघत असल्याचा भास होतो. हा लोगो जगभरात प्रसिध्द होणार आहे. संकल्प व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून अल्पदरात व्यसनाच्या आहारी गेलेल्या रूग्णांवर १४ दिवस उपचार केले जाणार आहेत. तसेच दैनंदिन रूग्णांची वैद्यकीय तपासणी, योगा, समुपदेशन आणि मनोरंजनाचे खेळ घेतले जाणार आहे. रूग्णाला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी संकल्प व्यसनमुक्ती केंद्र हे राज्यातील एकमेव नवा पर्याय असल्याचेही डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.
या केंद्रात २४ तास सर्वप्रकारच्या सुविधा रूग्णांसाठी उपलब्ध राहणार आहे. तरी रूग्णांनी या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर यांनी मानसोपचार विभागात फार मोठे बदल झाले आहेत. या बदलांचा परिणाम समाजातील व्यसनाधीन रूग्णांवर नक्कीच होईल. संकल्प जर दृढ असेल तर केंद्राच्या माध्यमातून रूग्ण हा १०० टक्के पूर्णपणे बरा होईल यात शंका नसल्याचे डॉ. आर्विकर यांनी सांगितले. यावेळी प्रा. माधुरी धांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन मानसोपचार विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. विलास चव्हाण यांनी केले. याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील यांनी व्यसनमुक्ती केंद्रातील सुविधांची पाहणी करून आढावा घेतला. यांची होती उपस्थिती कार्यक्रमाला रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी आशिष भिरूड, अशोक भिडे, निवासी डॉ. तेजस कोटेचा, नर्सिंग महाविद्यालयाचे संकेत पाटील, मनिषा खरात, पूनम चौधरी आदींसह परिचारीका उपस्थित होते.