डेल्टाचा ९८ देशांमध्ये फैलाव घातक : जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त

 

वाशिंग्टन : वृत्तसंस्था । अधिक संसर्गजन्य आणि उत्परिवर्तनाची शक्यता असलेल्या ‘डेल्टा’ कोरोना विषाणूमुळे जग सध्या घातक काळातून मार्गक्रमण करीत आहे, अशी चिंता जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रेसस यांनी व्यक्त केली.

 

कमी लसीकरण झालेल्या देशांच्या रुग्णालयांतील दृश्ये भयानक आहेत. त्या देशांमध्ये रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे, असे घेब्रेसस यांनी सांगितले. ‘डेल्टा’ या उत्पपरिवर्तित विषाणूमध्ये आणखी बदलाची शक्यता आहे. डेल्टा हा जास्त संसर्गजन्य विषाणू असल्याने जागतिक धोका वाढला आहे. अनेक देशांत त्याचा प्रादुर्भाव झाला आहे. जग सध्या सर्वांत कठीण काळातून जात आहे, अशी खंत घेब्रेसस यांनी व्यक्त केली.  अजून कुठलाही देश संकटातून मुक्त झालेला नाही. हा विषाणू उत्परिवर्तित होत असून त्यात आणखी बदल होत आहेत. त्यावर सातत्याने लक्ष ठेवून मूल्यमापन करण्याची गरज असल्याचेही घेब्रेसस यांनी स्पष्ट केले.

 

संसर्ग रोखण्यासाठी अंतर नियमाचे पालन, चाचण्या, रुग्णशोध इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. रुग्ण लवकर शोधणे, त्यांचे विलगीकरण करून उपचार करणे महत्त्वाचे आहे. रुग्णांमधील प्राणवायूचे प्रमाण तपासणे, तातडीने उपचार करणे आणि लसीकरण यांची नितांत गरज असून जागतिक नेत्यांनी याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहनही घेब्रेसस यांनी केले.    घेब्रेसस म्हणाले, ‘‘पुढील वर्षी या तारखेपर्यंत जगातील ७० टक्के लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. उपप्रकारांवर मात करण्यासाठी यावर्षी सप्टेंबरअखेर जगातील किमान १० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण व्हावे.’’

 

महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत शनिवारी सात लाख ९६ हजार ७३८ नागरिकांचे लसीकरण केले.  शुक्रवारी राज्याला सुमारे नऊ लाख लशींच्या मात्रा केंद्राकडून मिळाल्यावर राज्याने पुन्हा लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित केला, असे आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

 

‘डेल्टा’ विषाणू आतापर्यंत ९८ देशांत आढळला आहे. लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या देशांमध्ये त्याचा वेगाने प्रादुर्भाव होत आहे. ‘डेल्टा’मध्ये आणखी उत्परिवर्तन होत आहे. त्यामुळे जग एका घातक कालखंडातून मार्गक्रमण करीत आहे. ‘डेल्टा’च्या प्रतिबंधासाठी लसीकरण हाच प्रमुख उपाय आहे, असेही घेब्रेसस यांनी स्पष्ट केले.

 

Protected Content