मुंबई: खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमधील नावं असलेल्यांची चौकशी करण्यात येत असल्याचं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्यांचं नाव नसल्याचं सांगून ठाकरे सरकारला उघड पाडलं आहे.
मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या दाव्यानुसार सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केला असून या प्रकरणी वाझे यांना अटक करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी सरकारची बाजू घेण्याचा प्रयत्न करत डेलकर आत्महत्या प्रकरणावरून विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला.
तुम्ही जबाब वाचून जर वाझेंच्या अटकेची मागणी करत असाल तर त्याच न्यायाने डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्या लोकांची नावं आहेत, त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी परब यांनी लावून धरत विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, फडणवीस यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला. फडणवीस यांनी थेट डेलकर यांची सुसाईड नोटच सभागृहात फडकवली. माझ्या हातात डेलकर यांची सुसाईड नोट आहे. यात कोणत्याही पक्षाच्या नेत्याचं नाव नाही. प्रशासकाचं नाव आहे, प्रशासक कुणाच्याही पक्षाचे नसतात. सचिन वाझेंना वाचवण्यासाठी हे करु नये, असं सांगत फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांच्या आरोपातील हवा काढून टाकली.
या सुसाईड नोटमध्ये एकाही भाजप नेत्याचं नाव नसल्याचा दावा करतानाच ती सुसाईड नोटच त्यांनी सभागृहात फडकावली होती. त्यामुळे ठाकरे सरकार तोंडघशी पडलं आहे.