मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – आयएनएस विक्रांत प्रकरणी दाखल गुन्ह्यात भाजपच्या किरीट सोमय्या यांना अटकेपासून मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आला. कोर्टाच्या कडून दिलासा मिळाल्यानंतर लागलीच ‘डर्टी’ डझनला शिक्षा होत नाही तोवर हा लढा सुरु राहणार असल्याचे ट्वीट केले आहे.
नौदलाच्या आयएनएस विक्रांत युद्धनौका भंगारात जाण्यापासून वाचवावी यासाठी निधी जमा करण्यात आला. या निधी अपहार प्रकरणी भाजपाचे किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी सोमय्या यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबई हायकोर्टाने अटकेपासून संरक्षण देताना पोलिसांसमोर वेळोवेळी बोलवले जाईल त्यावेळी चौकशीला हजर राहण्याची सूचना केली आहे. आहे. मुंबई सत्र न्यायालयाचा आदेश चुकीचा असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.
तक्रादाराची तक्रार अस्पष्ट असून आयएनएस प्रकरणी ५७ कोटी निधी संकलन केले असल्याचा आरोप तक्रारदाराने कशाच्या आधारे केला याबाबतही तक्रारीत कुठेच उल्लेख नाही. तसेच कोणतेही ठोस असे उल्लेख नसून केवळ प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर आधारीत तक्रार आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांना अटकेपासून दिलासा देताना नमूद केले आहे. तसेच पोलिसांनी अटक केल्यास ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. मात्र चौकशीसाठी जेव्हाही बोलवले जाईल तेव्हा पोलिसांसमोर हजर राहावे लागणार असून उच्च न्यायालयाने १८ एप्रिलपासून पुढील चार दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश किरीट सोमय्यांना दिलासा देताना स्पष्ट केले आहे.
दाखल तक्रारीत कोर्टाने दिलासा दिला आहे, त्यामुळे मी मुंबई हायकोर्टाचे आभार मानतो. परंतु ठाकरे सरकारमधील डर्टी डझनला शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत या घोटाळेबाजाविरोधात लढा सुरु राहणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.