ठाकरे सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला का ! – भाजपाचा सवाल

jamner 1

जामनेर प्रतिनिधी । उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार रुपये व फळबागांसाठी ५० हजार रुपये देण्याच्या आश्वासनाचा विसर पडला का? असा सवाल करत जामनेर भाजपच्या वतीने सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, महिलांवरील वाढते अत्याचार यासह विविध मागण्यांसाठी भाजपने आज जामनेर तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडले. यावेळी सरकार विरोधी घोषणा देत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. आघाडी सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विरोधकांनी सरकारला विविध मुद्यांवरून कोंडीत पकडले आहे. शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई, सरकट कर्जमाफी, महिलांवरील वाढते अत्याचार यावरून विरोधक आक्रमक झाले असताना राज्यभरात देखील भाजपने सरकार विरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे. जामनेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यंमत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधतांना त्यांना शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचा टोला लगावला आहे.नागपूर येथे या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती; मात्र त्याचा लाभ अजूनही मिळालेला नाही. सातबारा कोरा करण्याचे आश्वासनदेखील या राज्य सरकारने पाळले नाही. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं होते, ती मदतही अद्याप मिळालेली नाही, असा आरोप करत भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुखांनाही धारेवर धरले. सरकारने दुटप्पी भूमिका सोडून शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

यावेळी चंद्रकांत बाविस्कर, बाबुराव घोंगडे, दिलीप खोडपे, महेंद्र बाविस्कर, कविता देशमुख आदींनी शासनाच्या फसव्या बाजू समोर मांडल्या. सूत्रसंचालन रवींद्र तायडे यांनी केले. जामनेर पं.स.सभापती सुनंदा पाटील, उपसभापती एकनाथ लोखंडे, जितेंद्र पाटील, डॉ.प्रशांत भोंडे, अमर पाटील, समाधान पाटील, शिवाजी सोनार, संगीता पाटील, तुकाराम निकम, छगन झाल्टे, राजेंद्र चौधरी, बबलू भंसाली, राजेश पाटील, उल्हास पाटील, विद्या खोडपे, शांताराम जाधव, लक्ष्मण गोरे, तालुकाभरातील पदाधिकारी जामनेर नगरपालिका सर्व नगरसेक, पं.स.सर्व सदस्य, जि.प. सदस्य, सरपंच आदी उपस्थित होते.

Protected Content