जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व्यापाऱ्याचे ट्रॅक्टरचा वापर करुन, तसेच ५० हजारांचे नुकसान करुन ट्रॅक्टर पुन्हा शोरुममध्ये उभे केल्याची घटना कुसूंबा येथे घडली आहे. याप्रकरणी पहूर येथील एका जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गोदावरी महाविद्यालय परिसरात हर्षल मधुसूदन भंडारी (वय ४६) हे वास्तव्यास आहेत. ते व्यापारी असून कुसूंबा येथे त्यांचे आदिनाथ नावाने शोरुम आहे. या शोरुममधून जामनेर तालुक्यातील पहूर येथील किरण राजाराम सोनवणे याने १ जून रोजी हर्षल भंडारी यांचे वापरते ट्रॅक्टर घेतले. सात दिवस हे ट्रॅक्टर परत न करता त्याचा वापर केला, तसेच ट्रॅक्टरचे नुकसान करुन ट्रॅक्टर शोरुममध्ये सोडून किरण सोनवणे निघून गेला. प्रकार समोर आल्यानंतर हर्षल भंडारी यांनी गुरुवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन किरण राजाराम सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफ्फार तडवी हे करीत आहेत.