जळगाव प्रतिनिधी । कोरोना संसर्ग स्थितीत लॉकडाऊन सुरू आहे. या काळात वीजचोरीची तपासणी होत नसल्याने बिनधास्त असलेल्या शहरातील ट्रान्सपोर्ट, ऑटोनगरातील वीजचोरांवर कारवाई केली आहे. सोमवारी वीजचोरीची कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी कक्ष प्रमुख सहाय्यक अभियंता सुरेश पाचंगे यांनी ट्रान्सपोर्ट, ऑटोनगरात पाहणी केली. यावेळी त्यांनी एअरबंच केबल टाकली असतानाही चुकीच्या मार्गाने विजेचा पुरवठा घेऊन त्याचा वापर करीत असलेल्या ४ व्यावसायिकांवर वीजचोरीची कारवाई केली. तसेच चौघांना १ लाखाचा दंड आकारण्यात आला.
एक कोटी खर्चून टाकली एबी केबल : परिसरात विजेचा सुरळीत पुरवठा व्हावा, यादृष्टीने महावितरण कंपनीने एक कोटी रुपयांच्या खर्चातून एलटी तारा काढून एअरबंच केबल टाकली होती. मात्र, महाभाग वीजचोरांनी छतावरून आकोडे टाकून अनधिकृत एसी, कार्यालय, बांधकामासाठी विजेचा वापर होत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तुषार चौधरी, साई लीला हॉटेल व ढाबाचालक शिवा गायकवाड यांच्यासह यमुनानगरमध्ये बांधकाम व्यावसायिकानेही मीटर न घेता बांधकाम सुरू केल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. चौघांना विजेचे बिले देण्यात आले असून ते न भरल्यास वीजचोरीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे, दरम्यान, वीजचोरी पकडल्यानंतर काहींनी वरिष्ठ राजकीय पदाधिकाऱ्यांमार्फत दबाव आणण्याचाही प्रयत्न केल्याचेही अभियंता पाचंगे यांनी सांगितले.