मुंबई : वृत्तसंस्था । विरार पूर्वमध्ये बालाजी रुग्णालयात एका रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली. विरार पोलीस ठाण्यात नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेतून विश्रांती मिळते न् मिळते तोच दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं. त्यामुळे पहिल्या फळीतील कोविड योद्धे असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आला आहे, असं असलं तरी दुसरीकडे डॉक्टरांवर हल्ले होत असल्याच्या घटनाही सातत्याने समोर येत आहे.
विरार पूर्वेला बालाजी हॉस्पिटल आहे. शनिवारी एक महिला रुग्ण आपली कोविड आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी गेली होती. चाचणी करताना या रुग्णाच्या नाकात आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणारी स्टिक तुटल्याचे समजले. यावेळी डॉक्टर पळून जात असल्याचा समजून इमारतीखाली उभ्या असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांला पकडून मारहाण करण्यात आली.
ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे हे शुटिंग नातेवाईकांनीच केलं असल्याचं व्हिडीओतून येणाऱ्या आवाजावरून कळत आहे. या संदर्भात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पोलिसांनी डॉक्टरांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कुणाला अटक केलेली नसल्याची माहिती विरार गुन्हे पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी दिली.