एरंडोल, प्रतिनिधी । इंडिया- बांगलादेश टेली कॉलॅबोरेशन प्रोजेक्टमध्ये जळगाव जिल्ह्यातील ५० इंग्रजी विषय शिक्षकांची निवड करण्यात आली असून तालुक्यातील उत्राण येथील जे. एस. जाजू विद्यालयाचे मुख्याध्यापक व व इंग्लिश टीचर्स वेल्फेअर असोसिएशन जळगावचे अध्यक्ष भरत शिरसाठ यांची जिल्हा समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे.
प्रादेशिक विद्या प्राधिकरण नाशिक आणि शिक्षण विभाग बांगलादेश यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिया बांगलादेश या दोन देशांमधील इंग्रजी विशेष शिक्षकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये टेली कॉलाबोरेशन प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. शाश्वत विकासाची सात ध्येय शिक्षकांपर्यंत पोहोचविणे दोन्ही देशांमधील शैक्षणिक व सांस्कृतिक विषयांचे आदान-प्रदान होणे हा या प्रोजेक्ट मागील हेतू आहे. योगेश सोनवणे, ज्येष्ठ अधिव्याख्याता, डायट नाशिक हे सदर प्रोजेक्टचे नॅशनल कॉर्डिनेटर असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम सुरु आहे. या प्रोजेक्ट करिता जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक स्तरावरील ५० इंग्रजी विषय शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या प्रोजेक्टकरिता जळगाव जिल्हा समन्वयक म्हणून जे. एस. जाजू विद्यालय उत्राणचे मुख्याध्यापक व इंग्लिश टीचर्स वेल्फेअर असोसिएशन जळगावचे अध्यक्ष भरत शिरसाठ हे काम पाहत आहेत. प्रत्येक शिक्षकाकरिता ९० मिनिटांचे १५ सेशन्स निर्धारित केले असून झूम ॲप व गुगल मीट सारख्या ऑनलाइन साधनाद्वारे सदर सेशन्स घेतले जात आहेत. प्रत्यक्ष सहभागी शिक्षकास आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेलीकोलॅबोरेशनचे प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. या आंतरराष्ट्रीय उपक्रमाद्वारे शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासास चालना मिळत असून विद्यार्थ्यांना सुद्धा आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होत आहे.