नवी दिल्ली: वृत्तसंस्था । भाजपच्या विरोधात देशात महाआघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. या महाआघाडीत टीएमसीसह काँग्रेसही सामिल होणार आहे.
या संदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लवकरच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ममता बॅनर्जी कालच पाच दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आल्या आहेत. त्यामुळे या चर्चेला बळ मिळालं आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पहिल्यांदाच दिल्लीत आल्या आहेत. त्या 27 ते 29 जुलैपर्यंत दिल्लीत राहणार आहेत. 30 जुलै रोजी त्या कोलकात्याला जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठींकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. बंगालमध्ये सत्तेत आल्यानंतर 2024मध्ये केंद्रातून मोदी सरकार घालवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. 28 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित राहण्याची शक्यता असून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
28 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी दिल्लीच्या चाणक्यपुरीमधील बंग भवनमध्ये परततील. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते पी. चिदंबरम, टीआरएस, आरजेडी, सपा, आम आदमी पार्टी आणि शिवसेनेच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. तृणमूलचे अखिल भारतीय महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे या बैठकीचे संयोजक असल्याचं सांगितलं जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी या सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. देशात महाआघाडी निर्माण होण्याच्या दृष्टीने या भेटीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांचं बंगालचं निवडणूक अभियान यशस्वी केलं होतं. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची तीनदा आणि सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची एकदा भेट घेतली होती. त्यामुळे देशात महाआघाडी निर्माण होण्याच्या शक्यतेने जोर धरला आहे.
2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीने काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांना घेऊन महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. या आघाडीने शक्ती प्रदर्शनही केलं होतं. त्यावेळी एकूण 23 पक्ष एकवटले होते. त्यामुळे भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहील असं बोललं जात होतं. मात्र, निवडणुकीपूर्वीच महाआघाडीचा हा प्रयोग फोल ठरला होता.