गोंडा: वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. येथील तीन बहिणींवर अॅसिड फेकले. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. गोंडा पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.
परसपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पक्का गावात ही घटना घडली आहे. एका तरुणाने झोपेत असलेल्या तीन बहिणींवर अॅसिड हल्ला केला. यात मोठी बहीण गंभीर होरपळली आहे. दोन बहिणी किरकोळ जखमी झाल्या आहेत. तिन्ही बहिणींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोठ्या बहिणीची प्रकृती गंभीर आहे. दोन बहिणींवर प्राथमिक उपचार करण्यात आले.
या घटनेनंतर मुलींच्या वडिलांनी सांगितले कि गॅस सिलिंडरचा भडका उडून मुली होरपळल्या असतील असे सुरुवातीला वाटले. मात्र, एका तरुणाने अॅसिड फेकल्याचे मुलीने सांगितले. अॅसिड हल्ल्यानंतर मुलगी किंचाळली. आवाज ऐकून दरवाजा उघडला. घटना घडली त्यावेळी झोपलो होतो. गावातील कुणाबरोबरच वाद नाहीत. त्यामुळे कुणावरही संशय नाही, असे त्यांनी सांगितले. घटनेमागील कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच परसपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधिकारी सुधीर सिंह यांनी अॅसिड हल्ल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.