रांची वृत्तसंस्था । झारखंड राज्यातील विद्यमान सरकार पाडण्याचा कट उघडकीस आला असून यात महाराष्ट्राचे माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तर बावनकुळे यांनी या आरोपाचा साफ इन्कार केला आहे.
झारखंड सरकार पाडण्याचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींनी याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. या कटात झारखंडचे तीन आमदार, दोन पत्रकार आणि काही मध्यस्थ सामिल होते, अशी माहिती या आरोपींनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. यातील धक्कादायक बाब म्हणजे यात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश असल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. याबाबत दैनिक हिंदूस्तान या वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. यात अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण प्रसाद महतो हे तीन प्रमुख संशयित असल्याचे यात नमूद केले आहे.
दिल्लीत तीन आमदारांची देवाणघेवाणाची डील झाली होती. यावेळी एक कोटी रुपये अॅडव्हान्स देण्याचंही ठरंल होतं. मात्र, हे पैसे न मिळाल्याने हे आमदार रांचीला पोहोचले होते. या डीलमध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि चरण सिंह यांचा समावेश होता, अशी कबुली या आरोपींनी दिल्यांची माहिती समोर आली आहे. बावनकुळे यांनी मात्र या आरोपाचा साफ इन्कार केला आहे. आपण कधीही झारखंडला गेलेलो नसून आपण एखाद्या राज्याचे सरकार पाडण्याइतके मोठे नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.