लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मका व ज्वारीचे पैसे जमा होणार-आ. अनिल पाटील

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील शेतकरी बांधव शासकीय धान्य हमी भाव खरेदी योजने अंतर्गत मका व ज्वारीच्या पैश्या पासून वंचित असतांना आ. अनिल पाटील यांनी सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडताच मंत्र्यांनी तत्परतेने दखल घेऊन तांत्रिक अडचणी दूर केल्याने लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे.

 

शासकीय धान्य हमी भाव खरेदी योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेचा खाते क्रमांक दिला होता. त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले होते. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अनुदानासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा खाते क्रमांक दिला होता. त्या खात्याला लिंकिंगची तांत्रिकदृष्ट्या अडचण निर्माण झाल्यामुळे संबधित शेतकरी माल विकून मिळणाऱ्या पैश्यापासून वंचित राहिले होते. यातील नेमकी अडचण आ. अनिल पाटील यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी मुंबई येथे सहकार मंत्री ना.बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन तांत्रिक अडचणी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्या. यामुळे मंत्र्यांनी तत्परतेने संबधित विभागाशी चर्चा करून तांत्रिक अडचणी तात्काळ दूर केल्या. यामुळे लवकरच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असा विश्वास आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे, यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे.

 

दरम्यान सहकार व कृषी याबाबत विशेष अभ्यास आमदार अनिल पाटील यांना असल्याने त्यांच्या माध्यमातून नेहमीच शेतकरी बांधवांचे हित साधले गेले आहे, शेतकरी हितासाठी सदैव क्रियाशील राहणारे आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण होऊ लागली आहे.

Protected Content