मुंबई प्रतिनिधी | आपण उल्लेख केलेला गावगुंड मोदी हा जगासमोर आल्याने आपण यावर काही बोलणार नसल्याचे नमूद करत ज्याची बायको पळून जाते त्याला मोदी म्हटले जाते असे वक्तव्य करून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नव्या वादाला आमंत्रण दिले आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडच्या काळात सातत्याने भाजपला लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमिवर, आज त्यांनी पुन्हा भाजपलाच लक्ष्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार बरखास्त करण्याच्या मागणीवर नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच भाजपवर जोरदार टीका केली आहे. यावेळी मोदी नावाच्या गावगुंडाबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देश अडचणीत आलाय. त्यावर भाजप का बोलत नाही? गुंडाची चर्चा त्या प्रवृत्तीचे लोक करतात. त्यावर मी बोलणार नाही. समोरचा व्यक्ती सांगतोय मग हे गुंड आहे का?, असं सांगतानाच गुंडाला प्रेमाची भाषा कळत नाही. त्यामुळे गुंडाला मारणार असं मी म्हणालो. याचा अर्थ जीवे मारणार असा होत नाही. मूळ विषयाला बगल देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मी ज्या गावगुंडाबाबत बोललो होतो. तो सर्वांसमोर आला आहे. आता या विषयावर मी बोलणार नाही, असं पटोले यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, याप्रसंगी नाना पटोले म्हणाले की, लोक भाजपला हसतात. त्याची बायको पळते, त्याच नाव मोदी ठेवलं जातं. बाकी काही राहिलं नाही आता. आम्ही महात्मा गांधींच्या विचारांची लोकं आहोत. आमच्या मनात असे विचार येत नाही. त्यांच्याच मनात विचार येतात, असा टोला त्यांनी लगावला.
या देशाची ओळख पुसण्याच काम केंद्रसरकार करत आहे. रिझर्व्ह बँकेचा फंड गायब करून टाकला आहे. देशाची रिझर्व्ह बँक लुटली गेली आहे. मोठी लूट होत आहे, असंही ते म्हणाले.