वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिकेतील ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ या कंपनीने विकसित केलेल्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे. एका स्वयंसेवकामध्ये एक आजार आढळल्याने ही चाचणी थांबवण्यात आली आहे.
याआधी ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ-एस्ट्राजेनका यांनी लस चाचणी थांबवली होती. लस चाचणीत सहभागी असलेल्या एका स्वयंसेवकामध्ये एक अनोळखी आजार आढळून आला. चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती बनवण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत ६० हजार स्वंयसेवकांचा सहभाग असणार होता. ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ने स्वयंसेवकांची ऑनलाइन नोंदणीदेखील थांबवली आहे.
कोणत्याही मोठ्या मानवी चाचणीत गंभीर प्रसंग उद्भवण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने काही मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली आहेत. त्याच मार्गदर्शक तत्वांनुसार, लशीची चाचणी थांबवण्यात आली आहे. ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ लशीची चाचणी अमेरिकेशिवाय दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना, ब्राझील, चिली, कोलंबिया, मेक्सिको आणि पेरूमध्ये होणार आहे.
‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ची लस इतर काही लशींच्या तुलनेत मागे असले तरी या लशीचा फायदा आहे. ही लस शून्य तापमानात ठेवण्याची आवश्यकता नाही. त्याशिवाय दोनऐवजी एकाच डोसमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित केली जाऊ शकते. इतर लशींचे दोन डोस स्वयंसेवकांना दिले जात आहेत.
याआधी याआधी ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ-एस्ट्राजेनका यांनी लस चाचणी थांबवली होती. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत सहभागी असलेल्या एका स्वयंसेवकाची प्रकृती खालावल्यामुळे चाचणी थांबवण्यात आली. मात्र, लशीचा आणि प्रकृती खालावण्याचा काही संबंध नसल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा चाचणी सुरू करण्यात आली. येत्या काही दिवसांत ऑक्सफर्ड विद्यापीठ-एस्ट्राजेनका यांच्या लस चाचणीचे परिणाम समोर येण्याची शक्यता आहे.