जैन इरिगेशनला चौथ्या तिमाहीत ९७६ कोटी नफा तर कर्जात २८०० कोटीची घट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  । जैन इरिगेशन सिस्टीम्स लि चे आर्थिक वर्ष २०२२-२३चे आर्थिक निकाल जाहीर झाले असून त्यात चौथ्या तिमाहीतील संपूर्ण उत्पन्न २७.१४ टक्क्यांनी वाढून ते १७४५.४१ कोटी रुपयावर पोहोचले. मागील वर्षी हेच संपूर्ण उत्पन्न १३७२ कोटी रुपये होते. जैन इरिगेशनच्या एकत्रित निव्वळ नफ्यात तीन पट वाढ झाली व यात तो ९७६.९ कोटी रुपये ३१ मार्च २०२३ अखेरीस नोंदवला गेला. तसेच जैन इरिगेशन कंपनीच्या विदेशातील उपकंपनीच्या रिवूलिसमध्ये विलिनीकरणानंतर कंपनीच्या कर्जात २८०० कोटी रुपयांची घट झाली.  गत वर्षी याच काळात जैन इरिगेशनचे संपूर्ण उत्पन्न ४७९४.९४ कोटी रूपयांवरुन ५७६१.८० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

 

या आर्थिक निकालावर प्रतिक्रिया देतांना जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल जैन यांनी सांगितले की “जैन इरिगेशन ही कंपनी भरारी घेत आहे. सामान्यपणे ही एक चांगली तिमाही होती. जैन इंटरनॅशनल ट्रेडींगचे रिवूलिसमध्ये (सिंगापूर मुख्य कार्यालय असलेल्या टेमासेकने पाठिंबा दिलेली कंपनी) विलिनीकरण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. हया व्यवहारामुळे कंपनीच्या संपूर्ण कर्जात२८०० कोटी रुपयांची घट झाली आहे, ” या व्यवहारातून मिळालेल्या रकमेचा वापर  आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाच्या आणि जैन इंटरनॅशनल ट्रेडींग यांच्या कर्जाचे रक्कम देण्यासाठी करण्यात आला आहे.  जैन इरिगेशनचे एकत्रित कर्ज जे ३१ डिसेंबर २०२२ला ६६४९.६५ कोटी रुपये होते आणि ते ३१ मार्च २०२३ला ३८२३.८३ कोटी रुपये राहिले. “आम्ही कंपनीचे संंपूर्ण कर्ज नवीन वर्षाच्या आधी आमच्या उत्पन्नातून ६०० कोटी रुपये रुपयांनी कमी करण्याचे नियोजन सुरु असून खेळत्या भांडवलाचे चक्र व उच्च नफा यात सुधारणा करुन कर्ज कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.”

 

जैन इरिगेशन कंपनीचे रिवूलिसमध्ये १८.८ टक्के भांडवल राहील तर येत्या दोन वर्षात हे भांडवल २० टक्क्यांपर्यंत वाढू शकते कारण कंपनी आंतरराष्ट्रीय व्यवसायाकडे अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. २०२३-२४ वर्षात कंपनीची वाढ चालूच राहील आणि ग्रामीण भागातील चांगल्या ऑर्डर्समुळे उत्पन्नात ३० टक्के वाढ अपेक्षित आहे.  सध्या कंपनीचा मुख्य व्यवसाय पश्चिम व दक्षिण भारतातून मिळतो आहे तर  उत्तर भारतातून सुद्धा चांगल्या ऑर्डर्स नोंदवल्या आहेत. भारतातील हवामान अंदाजानुसार अलनिनोमुळे नजीकच्या काळात कंपनीच्या भारतातील व्यवसायांवर नकारात्मक  परीणाम होणार नाही असा विश्वास आहे. कंपनीच्या हातात २३०० कोटीहून अधिक रूपयांच्या ऑर्डर्स असल्याचे असे श्री अनिल जैन  यांनी सांगितले.

Protected Content