चाळीसगाव, प्रतिनिधी । साहित्यातून माणसाला मोठी प्रेरणा मिळते याचा पुस्तक वाचनातून मी देखील अनुभव घेतला आहे. आजच्या डिजिटल युगात वाचनाची आवड कमी होत असताना आज देशपांडे सरांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न होतो आहे याचा अभिमान आहे. पुस्तकातून लीडर घडतो.जेथे लीडर ठाम तेथे केडर यशस्वी होतो असे प्रतिपादन खासदार उन्मेष पाटील यांनी केले. ते चाळीसगाव येथील माजी मुख्याध्यापक विश्वास देशपांडे लिखित “आकाशझुला” पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आज सायंकाळी अरीहंत मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
“आकाशझुला” पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर मु. जे. महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य तथा जेष्ठ विचारवंत प्रा, शरदचंद्र छापेकर,नगराध्यक्षा आशालता चव्हाण, व्यापारी संघाचे प्रदीप देशमुख,योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, मसापचे डॉ. प्रा. तानसेन जगताप, बेलगंगा साखर चेअरमन चित्रसेन पाटील, गुरुकुल शाळेचे अध्यक्ष प्रा. ल.वि.पाठक,लेखक विश्वास देशपांडे, श्रद्धा देशपांडे उपस्थित होते.
चाळीसगाव नगरीचा अटकेपार झेंडा – प्रा. शरदचंद्र छापेकर
या नगरीत अनेक साहित्यिक, लेखक,विचारवंत, कलावंत एवढेच नव्हे तर राजकारणी घडले ही भूमीच भाग्यवान आहे.अनेकांनी आपल्या विद्वततेने आपला ठसा उमटवला आहे.पुणे विद्यापीठाचे कुलगुरू ते केंद्रीय मंत्री हरिभाऊ पाटसकर असो वा सर्वच क्षेत्राशी आपली नाळ जोडलेले धडाडीचे तरुण खासदार उन्मेशदादा पाटील या सर्वांनीच चाळीसगाव नगरीचा झेंडा अटकेपार नेला आहे असे गौरवोद्गार प्रा. शरदचंद्र छापेकर यांनी व्यक्त केले.