नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात जून महिन्यात १२ कोटी कोरोना लशींचे डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. मात्र फैलाव पुन्हा वेगाने पसरू नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. फैलाव रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात मोठं हत्यार आहे. मात्र गेल्या काही दिवसात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे सरकारकडून लसीकरणाबाबत दररोज माहिती दिली जात आहे.
देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम १ मे पासून सुरु झाली आहे. शुक्रवारपर्यंत देशात २०.८६ कोटी लशींचे डोस दिले गेले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अजूनही १.८२ कोटी लशींचे डोस उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. पुढच्या तीन दिवसात ४ लाखांहून अधिक डोस मिळतील असं सांगण्यात आलं आहे.
तामिळनाडू, जम्मू काश्मीर आणि मध्य प्रदेशात लस वाया घालवण्याचं प्रमाण अधिक आहे. तामिळनाडूत १५.५ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये १०.८ टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये १०.७ टक्के लशी वाया गेल्या आहेत. आतापर्यंत देशात ६.३ टक्के लशी वाया गेल्या आहेत. लसीकरणाच्या शनिवारी २८ लाख ९ हजार ४३६ जणांचं लसीकरण केलं गेलं आहे.