भुसावळ प्रतिनिधी । संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक सेवा मिळत नसेल अथवा कुणी जादा दर घेत असतील तर याची तक्रार शिवसेनेकडे करावी असे आवाहन पक्षाचे भुसावळ तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी केले आहे.
या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात समाधान महाजन यांनी म्हटले आहे की, खाजगी रुग्णालये या काळात नियमित सुरू ठेवणे अतिआवश्यक आहे. तसेच किराणा दुकाने संचारबंदी शिथिल असताना सुरु ठेवण्यात यावे. ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी नियोजन करावे. किराणा साहित्याची एमआरपीपेक्षा जास्त दरात विक्री करु नये, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करुन काही दुकानदार ग्राहकांची लूट करत आहेत. तसेच भुसावळ तालुक्यातील अनेक खासगी रुग्णालये बंद करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. सूचनांकडे दुर्लक्ष करणार्यांची तक्रार नागरिकांनी पोलिस प्रशासनासह शिवसेनेकडे करावी, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. लोकांच्या तक्रारीचे तातडीने निराकरण केले जाणार असल्याची ग्वाहीदेखील समाधान महाजन यांनी दिली आहे.