जळगाव (प्रतिनिधी) शहरात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढता असला तरी नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहे. एखादा संसर्गबाधित व्यक्ती बाहेर फिरत असेल तर त्यामुळे अनेक लोक बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्व विक्रेत्यांची अँटीजन चाचणी करावी आणि ज्यांची चाचणी कोरोना निगेटिव्ह येईल त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे. तपासणीकामी अतिरिक्त अँटीजन टेस्ट किट मागवाव्या अशी मागणी महापौर भारतीताई सोनवणे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव महापालिकेकडून सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांना वारंवार आवाहन केल्यानंतर देखील लोक विनाकारण घराबाहेर पडत आहे. शहरात आज अनेक नागरिक कोरोना बाधित असण्याची शक्यता असून लॉकडाऊन उघडल्यानंतर बरेच विक्रेते, व्यावसायिक, दुकानदार बाहेर पडले आहे. बाधित लोकांमुळे कोरोनाचा फैलाव अधिक होण्याची शक्यता आहे.
विक्रेत्यांची करावी कोरोना चाचणी
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणखी कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे. शहरातील भाजीपाला, फळ, दूध, चिकन- मटन, सलून व्यावसायिक, मेडिकल चालक आणि किराणा दुकानदारांची कोविड-19 टेस्ट करण्यात यावी. मनपा प्रशासनाकडून त्यासाठी नियोजन करून अतिरिक्त अँटीजन टेस्ट किट मागवाव्या अशी मागणी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.
आयुक्तांनी भाजीपाला, व्यापारी असोसिएशनशी संपर्क साधावा
भाजीपाला विक्रेते, व्यावसायिक, सलून, मेडिकल, व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी मनपा प्रशासनाने संबंधित असोसिएशनशी समन्वय साधून तपासणीसाठी मोबाईल टीम नेमाव्या. तसेच प्रत्येक गटाच्या तपासणीसाठी काही दिवस निश्चित करून घ्यावे, अशी मागणी देखील महापौरांनी केली आहे.
सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे
जळगाव शहरात आज हजारो जीवनावश्यक वस्तू विक्रेते आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रेते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांची अँटीजन टेस्ट करणे आवश्यक आहे. टेस्ट करताना गटवारी करून कोणताही गोंधळ होणार नाही, सोशल डिस्टनसिंगचे पालन होईल यासाठी शहरातील आयएमए, डॉक्टर, मेडिकल असोसिएशन, सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे असेही महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सुचविले आहे.