जळगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग ७ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज काढले आहे.
गेल्या महिन्याभरापासून २३ नोव्हेंबर पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय राज्य शासनाने घेतला होता. पंरतू दिवाळीत प्रवाश्यांची येणे व जाण्याची गर्दी आणि काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ७ डिसेंबर पर्यंत कोणतेही वर्ग सुरू न करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतला आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेशाचे परिपत्रक काढले आहे. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून ७ डिसेंबर नंतर शाळा सुरू ठेवावे की नाही याचा निर्णय पुन्हा घेण्यात येणार असल्याचेही परिपत्रकात नमूद केले आहे.