जिल्ह्यात शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र राहणार सुरू

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ग्राहकांना वीजबिल भरणा करण्यास सुविधा व्हावी याकरिता सुटीच्या दिवशी देखील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार असून डिजिटल माध्यमांद्वारे ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

 

ग्राहकांना वीजबिल भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी शनिवार दि. २८ मे व रविवारी दि. २९ मे जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. यासह डिजिटल माध्यमांद्वारे ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्याचे महावितरणने केले आहे. बिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल ॲपवर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून सुरक्षित व सुलभपणे वीजबिल भरता येते. याशिवाय विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते. अखंडित वीज सेवेसाठी चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Protected Content