एरंडोल प्रतिनिधी । कोविडचे सावट पूर्ण गेले नसतांनाही पाणी पुरवठा व स्वच्छता खात्यातील निधीला कोणतीही कात्री लागली नाही. या अनुषंगाने जिल्ह्यात यंदा तब्बल ४०० कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजना मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील रिंगणगाव, सावदा आणि पिंपळकोठा येथे विविध विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण केल्यानंतर बोलत होते.
एरंडोल हा आपला जुना मतदारसंघ असून इतर तालुक्यांप्रमाणेच यावर आपले विशेष प्रेम असल्याचेही पालकमंत्र्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चिमणआबा पाटील होते तर विशेष उपस्थिती जि.प. अध्यक्षा रंजनाताई पाटील यांची होती.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव, सावदा आणि पिंपळकोठा या गावांमधील विविध विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हापरिषद सदस्य नाना महाजन यांनी केले. त्यांनी विकास कामांची सविस्तरपणे माहिती विषद करून जि. प. गटात निधी उपलब्ध करून दिल्याबाद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय महाजन सर यांनी केले. तर आभार लोकनियुक्त सरपंच संभाजी चव्हाण यांनी मानले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे ढोलताशे व फटाक्यांच्या आतषबाजी करून गावा गावांत मिरवणुक काढून जंगी स्वागत करण्यात येवून जिल्हा वार्षिक योजनेतून भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जि. प. सदस्य नाना महाजन , त्या त्या गावाचे सरपंच , सदस्य व पदाधिकार्यांनी सत्कार केला.
आमदार चिमणआबा पाटील यांनी आपल्या मनोगतातून ना. गुलाबराव पाटील यांचा एरंडोल हा जुना मतदारसंघ असून त्यांनी निधी प्रदान करतांना कोणताही भेदभाव केला नाही, यात कमतरता पडू दिली नसल्याचे नमूद केले. ना. गुलाबरावांची साथ ही प्रगतीची साथ असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी आपल्या खास शैलीतील ओघवत्या भाषणातून एरंडोल तालुक्यासोबतच्या आपल्या ऋणानुबंधाला पुन्हा उजाळा दिला. आपल्या राजकीय कारकिर्दीत एरंडोल तालुक्याचे महत्वाचे स्थान असून या तालुक्यातील विविध विकासकामांना आपण निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. जळगाव जिल्ह्यात नियोजन मंडळाच्या माध्यमातून विविध कामांचे अतिशय चोख आणि काटेकोर नियोजन करण्यात आले असून विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे. एरंडोल तालुक्यातही याच प्रमाणे विकासकामे सुरू असल्याबद्दल ना. गुलाबराव पाटील यांनी कौतुकोदगार काढले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने, महानंदा पाटील, जि.प. सदस्य नाना महाजन, मोहन सोनावणे, उपसभापती जगदीश पाटील, तालुका प्रमुख वासुदेव पाटील, रमेश महाजन, रवि चौधरी, जगदीश पाटील, रमेश महाजन, किशोर निंबाळकर, अनिल महाजन, डॉ.सतीश देवकर, हिम्मत पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, पिंपळकोठा सरपंच गीता पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान पाटील, तहसिलदार सुचिता चव्हाण, अनिल महाजन, संभाजी चव्हाण, सावदे सरपंच गोपाळ पवार, वासुदेव पाटील, ग्रामसेवक संजय चव्हाण विविध गावांचे सरपंच सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.