जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात दोन दिवसांपासून सकाळीच ढगाळ वातावरण तर दुपारनंतर तप्त उन्हाच्या झळांमुळे जिल्हावासीयांना विषम वातावरणाचा अनुभव येत आहे. रब्बी हंगामातील पिके काढणी, कापणीस आलेली असून या असमतोल हवामानामुळे बेमोसमी पावसाच्या चिंतेचे वातावरण शेतकरी वर्गात दिसून येत आहे.
जिल्ह्यात गेल्या फेब्रुवारी पासूनच तापमानात वाढ होत आहे. गत सप्ताहात तापमानाचा पारा चाळीशी पार करून तब्बल ४२ अंशांपर्यंत पोचला होता. परंतु दोन दिवसांपासून जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण तर दुपारी तप्त उन असा काहीसा बदल दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून चक्रीवादळाचे संकेत असल्याचे हवामान अभ्यासकांनी अंदाज वर्तवला आहे. या चक्रीवादळामुळे बेमोसमी पावसाचे संकेत नसले तरी तापमानाचा पारा एक अंशाने उतरला असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात रब्बी हंगामातील हरबरा, गहू, सुर्यफुल, ज्वारी, मका आदी पिके काढणी व कापणीवर आलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी हरबरा गहू मळणी यंत्रावर काढणी हंगाम सूरु आहे. त्यातच दोन दिवसांपासून हवामान ढगाळ असल्याने शेतकरीवर्गात बेमोसमी पावसाच्या चिंतेचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.