जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून मुस्लिम भाविकांना हज यात्रेसाठी जाता आले नव्हते. परंतु आता सौदी अरेबियाने परवानगी दिल्याने यावर्षी भारतातून भाविक हज यात्रेसाठी जाणार आहे. यानुसार जळगाव जिल्ह्यातून जवळपास २५० भाविक हज यात्रेला जाणार आहेत. त्यांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आयुष विभागात यात्रेपूर्वी आज शनिवार दि. ११ जून रोजी लसीकरण करण्यात येत आहे.
मुस्लीम बांधवांसाठी हज यात्रेचे अनन्य साधारण महत्व आहे. हज यात्रेसाठी हज कमिटीतर्फे मुस्लीम बांधव नंबर लावतात. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा असलेला संसर्ग व त्याअनुषंगाने लावण्यात आलेले कडक निर्बंधांमुळे हज यात्रा बंद होती. यावर्षी सौदी अरेबिया शासनाने परवानगी दिल्याने भाविकांनी हज यात्रेसाठी नंबर लावले होते. जळगाव जिल्ह्यातून जवळपास २५० भाविक हज यात्रेसाठी जाणार आहेत. हज यात्रेच्या पूर्वतयारी निमित्त हज कमिटीच्या वतीने भाविकांना मेंदूज्वर, पोलिओ, स्वाईन फ्ल्यू आदी आजारांची लस दिली जात आहे. ही लसीकरण मोहीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आयुष विभागात सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा हज ट्रेनर शेख इकबाल अहमद यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजला दिली. हज यात्रेकरू पहिला जत्था १८ जून रोजी रवाना होणार असल्याचे ट्रेनर अहमद यांनी यावेळी सांगितले. या लसीकरण यशस्वीतेसाठी खलिफ बागवान, इसाक भाई , शासकीय रुग्णालयातील सहकार्य लाभत आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/553522153154176