जळगाव जिल्ह्यातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पीएम केअर्सला आर्थिक मदत !

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या लढ्यास शासनाच्या प्रयत्नाना बळ देण्यासाठी जिल्हयातील अनेक दानशूर संस्था व व्यक्तींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 28 लाख 54 हजार रुपयांची तर पीएम केअर्सला 65 हजार रुपये असे एकूण 29 लाख 19 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तर अनेकांनी परस्पर संबंधित खात्यांवर मोठ्या प्रमाणात रक्कम वर्ग केली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी दिली आहे.

 

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतानाच याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी देशभर लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य गरीब व गरजूंना चांगल्या आरोग्यसेवा देता याव्यात. यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पीएम केअर्सला मदत करण्याचे आवाहन प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांनी नागरीकांना केले आहे. त्यांच्या आवाहनास जिल्ह्यातील अनेक उद्योजक, स्वयंसेवी संस्था, धार्मिक स्थळे भरभरुन प्रतिसाद देत आहे.

 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 ला जिल्ह्यातील ओमप्रकाश सिताराम अग्रवाल एक लाख रूपये, जळगाव तालुका कृषक सहकारी क्रयविक्रय संस्था, लि. जळगाव तीन लाख रुपये, चिन्मय मीशन, जळगाव पंचवीस हजार रूपये, अभय विजय मुठा एकावन्न हजार रूपये, रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, सहा लाख रूपये, सुशिल बहुमंडळ, जळगाव पंचवीस हजार रूपये, कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव दहा लाख एक्काण्णव हजार रूपये, राजेश शहा, जळगाव मेटल मर्चंट असो. अकरा हजार रूपये, युगाश्री जय साई हाऊस प्रा. लि. एक लाख रूपये, जळगाव जिल्हा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या. जळगाव एकावण्ण हजार रूपये तर श्रीक्षेत्र गणपती मंदिर, पद्मालय यांचेकडून पाच लाख रुपये असे एकूण 28 लाख 54 हजार रोख व धनादेश स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केले आहे.  तर पी. एम. केअर्सला अग्रीमा रिलेटर्स प्रा. लि. जळगाव यांनी पन्नास हजार रुपये व राजेश शहा, जळगाव मेटल मर्चंट असो. पंधरा हजार रुपये धनादेशाद्वारे दिले आहे. असल्याचेही श्री कदम यांनी सांगितले.

Protected Content