


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव हा मुळातच कृषीप्रधान जिल्हा असून येथील शेती क्षेत्रात सातत्याने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, काळाच्या ओघात जमिनीचा पोत टिकवून ठेवणे आणि शाश्वत उत्पादनवाढ साध्य करणे हे मोठे आव्हान बनले आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनी सुपीक ठेवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘शेतकरी सन्मान’ सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, महापौर दीपमाला काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्या प्रास्ताविकाने झाली, ज्यात त्यांनी कृषी दिनाचे महत्त्व आणि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा विहीर योजनेचे कार्यारंभ आदेश वितरित करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे उद्योजक शेतकरी आणि खरीप हंगामात उल्लेखनीय उत्पादन घेणाऱ्या प्रगत शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सध्याच्या हवामान बदलावर चिंता व्यक्त केली. एल-निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करता शेतकऱ्यांनी पेरणी करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भागात सिंचनाची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही, त्या भागातील शेतकऱ्यांनी घाई न करता किमान ८० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच जिल्ह्यात बियाणे आणि रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतीची सुपीकता दीर्घकाळ टिकवण्यासाठी एकपिकीय पद्धतीऐवजी मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करावा आणि “जळगाव आपलं राज्यात पहिलं” या संकल्पनेनुसार जिल्ह्याला कृषी क्षेत्रात सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी शेतकरी व कृषी विभागाने समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या संकल्पनेचा गौरव केला. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे आजचा शेतकरी समृद्धीकडे वाटचाल करत असून, जिल्हा परिषद शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या वापरात स्वयंपूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्याच्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय (AI) तंत्रज्ञानामुळे क्रांतिकारी बदल घडत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढेल आणि शेती अधिक सक्षम होईल. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील एआय आधारित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन त्यांनी आपल्या मनोगतात केले.



