जिल्ह्यातील बाजार समितींंसाठी ५ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान

जळगाव, प्रतिनिधी | राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रम केला जाहीर केला असून ५ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान होणार आहे. यात जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांचा समावेश आहे.

 

राज्यासह जिल्ह्यात बाजार समित्यांची पाच वर्षांची मुदत २०२० मध्येच संपुष्टात आली आहे. काही बाजार समित्यांना दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असले तरी, कोरोना संसर्ग प्रादूर्भाव पाहता, सहकार विभागाने निवडणुका लांबणीवर टाकून संचालक मंडळांना मुदतवाढ देऊन काही ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले होते. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात येऊन तिसऱ्या लाटेची शक्यताही मावळल्याने सहकार विभागाने निवडणुका घेण्यात येत आहेत. यात स्थगित झालेल्या वा पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. आदेशानंतर मतदार याद्या तयार करून सहकारी निवडणूक प्राधिकरणाला देण्याची सूचना संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

 

असा असेल निवडणूक कार्यक्रम
२५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२१ सहकारी संस्था, गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सूची मागवून १५ नोव्हेंबरपर्यंत समिती सचिवांकडे प्रारूप यादीसाठी सदस्य सूची पाठवावी. बाजार समिती सचिवांनी २९ नोव्हेंबरपर्यंत प्रारूप मतदारयादी तयार करून पाठवावी. त्यानुसार १ डिसेंबरला प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना आहेत. १ ते १० डिसेंबर दरम्यान प्रारूप मतदार यादीवर आक्षेप हरकती, तर अंतिम मतदारयादी २४ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर ३ जानेवारी २०२२ रोजी निवडणूक अधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. यात नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती ३ ते ७ जानेवारी २०२२, नामनिर्देशन पत्र छाननी १० जानेवारी २०२२, वैध नामनिर्देशन पत्राची प्रसिद्धी ११ जानेवारी २०२२, माघार ११ ते २५ जानेवारी २०२२, निवडणूक चिन्हांसह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध २७ जानेवारी २०२२, मतदान ५ फेब्रुवारी २०२२ तर मतमोजणी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.

Protected Content