जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लिंगाला झालेल्या कर्करोगाची दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात वैद्यकीय पथकाला यश आले. यामुळे रुग्णाचे प्राण वाचले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. यामुळे रुग्णाला दिलासा मिळाला आहे.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील ४५ वर्षीय इसमाला ४ महिन्यांपासून हा त्रास होत होता. लघवी करण्यासाठी दुखत होते. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नातेवाईकांनी दाखल केले होते. तपासणीअंती त्याच्या लिंगाला कर्करोगाची गाठ असून ती वाढली असल्याचे दिसले. शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख व उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी कर्करोग झालेल्या लिंगाच्या भागाचा तुकडा घेऊन त्याची तपासणी करीत रोगनिदान केले. त्यानंतर या इसमाची हि अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया २ तास चालली.
शस्त्रक्रिया शुक्रवारी १५ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आली. लिंगाच्या कर्करोगामुळे मूत्रवाहिनीचा मार्ग देखील बाधित झालेला होता. शस्त्रक्रियादरम्यान तो बदलून नवीन मार्ग तयार करण्यात आला. त्यासाठी उजव्या बाजूचे अंडाशय काढून मूत्रमार्ग तज्ज्ञ डॉक्टरांनी तयार केला. हि अवघड शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला अतिगंभीर ते नॉर्मल स्थितीत आणण्यात आले. आता उर्वरित कर्करोगाचे उपचार करण्यासाठी डॉक्टर नियमित तपासणी करतील.
लिंगाची स्वच्छता न ठेवणे, असुरक्षित संबंध ठेवण्यामुळे होणारे इन्फेक्शन, तसेच शिश्नमुंडाजवळ जमा झालेला मल या कारणाने हा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्याकरिता वेळोवेळी स्वच्छता करणे व काळजी घेणे महत्वाचे आहे. लिंगाजवळ दुखत असेल किंवा त्वचेच्या समस्या जाणवत असतील तर त्वचाविकार विभागात तपासणीसाठी आले पाहिजे, असे डॉ. मारोती पोटे यांनी सांगितले. डॉ. मारोती पोटे यांनी ४ वर्षे औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात सेवा दिलेली असून अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत.
लिंगाला झालेल्या कर्करोगाची दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पोटे यांना डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विपीन खडसे, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ.समीर चौधरी, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, परिचारिका नीला जोशी यांनी सहकार्य केले.