जळगाव प्रतिनिधी । अपंग प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांची फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात नित्याचे झाले आहे. अशातच दिव्यांग तसेच फिटनेसचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पिडीतकडून दलालाने तीन हजार रुपये घेतल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी उमेश पाटील नामक दलालाविरुध्द जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विश्वास रंगराव पाटील (४७, रा.कंकराज, पो.भिलाली, ता.पारोळा) हे खासगी एजन्सीत सिक्युरीटी गार्ड म्हणून नोकरीला आहेत. त्यांना जन्मापासून उजव्या हाताचे अपंगत्व आहे. शासनाकडून याबाबत प्रमाणपत्रही मिळालेले आहे. मात्र प्रमाणपत्राची मुदत १२ सप्टेबर २०१९ रोजी संपत असल्याने १८ सप्टेबर २०१९ रोजी ते नुतनीकरणासाठी ते जिल्हा रुग्णालयात आले होते. तेव्हा शेख नावाच्या डॉक्टरने हातात सुधारणा होऊ शकते, त्यासाठी तुम्हाला दवाखान्यात दाखल व्हावे लागेल असे सांगितले होते. त्यानुसार दाखल होण्याची संमती दाखविली असता नंतर डॉक्टरांनी दाखल करुन घेतले नाही. २५ सप्टेबर रोजी पुन्हा प्रमाणपत्राच्या नुतनीकरणासाठी आले असता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी दलालांना पैसे द्यावे लागतात, असे सांगण्यात आले. त्यासाठी उमेश पाटील नावाच्या दलालाचे नाव समोर आले व हा उमेश पाटील त्याच ठिकाणी भेटला. त्याला सर्व प्रकार सांगितला असता ४० वरुन ४५ टक्क्याचे प्रमाणपत्र करुन देतो, त्यासाठी ५ हजाराची मागणी दलालाने केली. तडजोडीअंती ३ हजार रुपयात हे प्रमाणपत्र नुतनीकरण करुन देण्याचे ठरले. उमेश पाटील याने ही रक्कम घेतली, मात्र त्यानंतर त्याने प्रमाणपत्र न देता उडवाउडवीचे उत्तरे दिली. आजतायगत त्याने प्रमाणपत्रही दिले नाही किंवा त्याची मुदतही वाढवून दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विश्वास पाटील यांनी सोमवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिल्यने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.