सावदा, प्रतिनिधी । येथील नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते फिरोजखान हबिबुल्ला खान पठाण यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनागोंदी काभाराविरोधात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार केली असून आमदारांनी फोन करूनसुद्धा रुग्णांस कोणताही उपचार न मिळाल्याने दुर्दैवाने त्या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आणून देऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विरोधीपक्ष नेते फिरोजखान हबिबुल्ला खान पठाण यांच्या नातेवाईकाला हृदयाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना सावदा येथे ११ मे रोजी खासगी डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उचारासाठी जळगाव येथे नेण्याचे सांगितले. जळगाव येथे खासगी डॉक्टरांना विनवणी करू देखील त्यांनी रुग्णांस दाखल करून घेण्यास नकार दिला. यानंतर मंगळवार १२ मे रोजी पहाटे २ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात त्या रुग्णास भरती केले. परंतु, तेथे डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत कोणताही उपचार केला नाही.
आमदारांच्या फोननंतरही उपचार नाहीच
दरम्यान, आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी रुग्णालयात फोन करून देखील रुग्णांची कोणतीही काळजी घेतली गेली नाही. दुर्दैवाने १२मे रोजी संध्याकाळी सात वाजता तो रुग्ण दगावला. या रुग्णांचे मृत्यूनंतर स्वॅब घेण्यात आले. मात्र, १८ तारखेपर्यंत वारंवार फोन करून देखील रिपोर्ट मिळालेले नाहीत यावरुन तेथील अनागोंदी कारभाराची प्रचीती येते असा आरोप पठाण यांनी केला आहे. आज कोरोनाबाबत जेवढी भीती नाही त्यापेक्षा जास्त भीती जिल्हा सामान्य रुग्णालय तेथील डॉक्टरांबद्दल व्यक्त केली जात असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे. पालकमंत्री व आमदारांनी जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांना दवाखाने उघडे ठेऊन उपचार करण्याची सक्ती कारवी अशी मागणी त्यांनी केली आहे.