जळगाव प्रतिनिधी । जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे घेण्यात आलेल्या नोकर भरती प्रकरणी एनएसयुआयने केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून याबाबत चौकशी करण्यात आली आहे. तथापि, आता नोकर भरतीची उर्वरित प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी मागणी आता एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
याबाबत वृत्त असे की, गेल्या जानेवारी महिन्यामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जवळपास ४५० पदांसाठी आयोजित केलेल्या नोकर भरती प्रक्रियेबद्दल जिल्हा एनएसयूआयने आक्षेप घेत, संपूर्ण नोकर भरतीची सखोल चौकशी व्हावी या प्रकारची मागणी केली होती. जिल्हा बँक नोकर भरती घोटाळ्याची चौकशी ही सुरू झालेली आहे जर जिल्हा बँकेची नोकर भरती प्रक्रिया पारदर्शक नसेल तर उर्वरित नोकर भरती प्रक्रिया ही तात्काळ स्थगित करून जबाबदार लोकांवरती तात्काळ कारवाई करण्याची जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली. या संदर्भात त्यांनी एक निवेदन जारी केले आहे.
१५ ते २० लाखाचा फुटला होता रेट
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा बँक पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण नोकर भरती प्रक्रिया संशयास्पद होती. त्यामुळेच २५ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती की, संपूर्ण नोकरभरतीची सखोल चौकशी व्हावी व तसेच उर्वरित मुलाखत प्रक्रिया पारदर्शक पणे पार पाडण्यासाठी मुलाखती या स्थानिक कमिटी मार्फत न घेता प्रशासक नेमावा. तसेच त्यांच्या मार्फत छायाचित्रीकरण करून मुलाखत प्रक्रिया पार पाडण्यात यावी. परंतु जिल्हा बँकेने संपूर्ण मुलाखत प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पाडलेली नाही. ही प्रक्रिया जिल्हा बँकेने त्यांच्या मर्जीतील स्थानिक कमिटी सदस्य मार्फतच घेण्यात आली. जेणेकरून कुठेतरी एका जागे मागे १५ ते २० लाख रुपयांचा भ्रष्टाचार करता यावा, याकरिता जिल्हा बँकेने ही प्रक्रिया त्यांच्या मर्जीतील स्थानिक कमिटी सदस्य मार्फतच पार पडली असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
अप्पर आयुक्त डॉ. आनंद जोगदंड यांनी घेतली दखल
दरम्यान, अप्पर आयुक्त व विशेष निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे डॉ.आनंद जोगदंड यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा बँकेच्या नोकर भरती घोटाळ्याची व त्यासंबंधी एनएसयूआय ने केलेल्या तक्रारीची दखल घेत ३१ जानेवारी रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालय नाशिक यांना पत्र लिहून जिल्हा बँकेकडून संपूर्ण नोकर भरतीची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. अप्पर आयुक्त यांच्या आदेशानुसार विभागीय सहनिबंधक कार्यालयाने २३ मार्च रोजी जळगाव जिल्हा बँकेला पत्र लिहून आदेश दिले की जानेवारी महिन्यामध्ये पार पडलेल्या संपूर्ण नोकर भरतीतील मुलाखतीचे छायाचित्रीकरण तसेच परीक्षा संदर्भातील संपूर्ण नियोजन रूपरेषा वेळापत्रक यासंदर्भातील मुद्देसूद माहिती लवकरात लवकर विभागीय सहनिबंधक कार्यालया कडे पाठवावे. व त्याची एक प्रत जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनासुद्धा पाठवण्यात आली. परंतु लॉक डाऊन असल्यामुळे हे पत्र मराठे यांना आज २३ जून रोजी मिळाले. दरम्यान, जळगाव जिल्हा बँकेने विभागीय सहनिबंधक कार्यालयाचे आदेश डावलत आज पर्यंत घेतलेल्या नोकर भरती प्रक्रियेविषयी कुठलीही माहिती जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय सहनिबंधक कार्यालय नाशिकला पाठविलेली नाही. त्यामुळेच संपूर्ण नोकर भरती संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
या निवेदनात देवेंद्र मराठे यांनी पुढे म्हटले आहे की, जिल्हा बँकेने विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे नोकरभरतीची कुठलीही माहिती न पाठवल्याने संपूर्ण चित्र स्पष्ट होतं की, जिल्हा बँकेची नोकर भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडलेली नाही व या संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली की उर्वरित जिल्हा बँकेची संपूर्ण नोकर भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी. तसेच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झालेला असेल तर यास जबाबदार असलेल्या जिल्हा बँकेच्या संपूर्ण प्रशासनावर ती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुध्दा या निवेदनात करण्यात आली आहे.