जळगाव विशेष प्रतिनिधी । अधिकार्यांसह स्वकीयांवरच तोफ डागून जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला ताई पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे. आता त्यांचा निशाणा नेमका कुणावर ? त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न नेमका कोण करतेय ? याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई पाटील यांनी काल पत्रकारांशी बोलतांना आपल्या मनातील व्यथा बोलून दाखविल्याने राजकीय वर्तुळातील वातावरण ढवळून निघाले आहे. मिनी मंत्रालय म्हणून गणल्या जाणार्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या मार्गात स्वपक्षाच्या काही पदाधिकार्यांसह अधिकार्यांचा एक गट अडथळे आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांना आरोपातून स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेत युतीची सत्ता असली तरी सारेच काही आलबेल नसल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. मध्यंतरी निधी वाटपावरून सत्ताधार्यांमधील नाराजी जाहीरपणे समोर आली होती. लवकरच जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असतांनाही कुणाची फारशी भरीव कामगिरी दिसून आलेली नाही. याआधीदेखील जिल्हा परिषदेत एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्या गटाचे समर्थक असले तरी २०१७ सालच्या निवडणुकीनंतर महाजन गट प्रबळ झालेला आहे. अध्यक्षपदाच्या निवडीत दोन्ही गटांना मान्य असणार्या उज्ज्वलाताई मच्छींद्र पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना बर्यापैकी यशदेखील आले. यामुळे किमान वरून पाहता सर्व काही सुरळीत असल्याचे भासत होते. मात्र आता जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गौप्यस्फोटाने या शांततेमागचे वादळ घोंगावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जि.प. अध्यक्षा उज्ज्वलाताई पाटील यांनी आपल्याच पक्षाचे काही पदाधिकारी आणि अधिकार्यांचे नाव न घेता त्यांच्या आडमुठेपणाबाबत पहिल्यांदाच मौन सोडले आहे. आपल्याला ही मंडळी डावलत असून यासाठी त्यांनी थेट महिला आयोगाचे दार ठोठावण्याचा इशारा दिला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्ताधार्यांमधील गटबाजी आता शिगेला पोहचल्याचे दिसून येत आहे. आता या प्रकरणी महिला आयोग नेमका काय हस्तक्षेप करणार हे कुणालाही सांगता येणार नाही. तथापि, यातून भाजपमधील अंतर्गत कलह उघड झाला आहे. खरं तर, आज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासकामांना गती देण्याची नामी संधी या पक्षाला मिळालेली आहे. मात्र पक्षातील गटबाजीचा फटका बसल्यामुळे अपेक्षेनुसार विकास होत नसल्याची आधीच दिसून येत असतांना आता जिल्हा परिषद अध्यक्षांनी थेट स्वकीयांनाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केल्याचा अर्थ हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभा आणि त्यासोबत अथवा त्यांच्या नंतर विधानसभा निवडणूक होत असतांना या प्रकारचे आरोप हे भाजपमधील भाऊबंदकीला भेदकपणे जगासमोर मांडणारे ठरले आहेत. आज उज्ज्वलाताई पाटील यांनी नाव न घेता आरोप केले असले तरी त्यांना हे प्रकरण तडीस न्यायचे असेल तर वार्याला लाथा न मारता थेट नाव घेऊन आरोप करावे लागणार आहेत. अन्यथा, या प्रकारांमुळे घडीभरच्या चर्वणाच्या पलीकडे काहीही साध्य होणार नाही.