जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांच्या कालावधीनंतर ऑनलाईन घेण्यात आलेल्या लोकशाही दिनात जिल्हाभरातून दहा अर्ज प्राप्त झाले आहेत.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, ७ डिसेंबर रोजी ऑनलाईन लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाईन लोकशाही दिनात तहसीलदार, जळगाव कार्यालायातून सात व्यक्ती सहभागी झाले होते. त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संबंधित तक्रार अर्ज सादर केले. तर तहसिलदार, जामनेर यांच्या कार्यालयातून ३ व्यक्ती सहभागी झाली होत्या. त्यापैकी १ अर्ज नगरपरिषद शेंदूर्णी, १ अर्ज तहसील कार्यालय, जामनेर तर १ अर्ज जिल्हा परिषद, जळगाव यांचेशी संबंधित होता. यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी प्राप्त तक्रारदारांच्या तक्रारी जाणून घेतल्या. तसेच या तक्रारी तातडीने सोडविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. या लोकशाही दिनास जिल्हाभरातील विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले होते.