जिल्हाधिकार्‍यांची सिव्हील हॉस्पीटलमध्ये झाडाझडती

avinash dhakne

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला (सिव्हिल) जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अचानक भेट देऊन अनेक वॉर्डाची पाहणी केली. यात अनेक गैरप्रकार आढळून आल्याने जिल्हाधिकार्‍यांनी झाडाझडती घेतली.

बुधवारी संध्याकाळी ७.३० वाजता जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी मेडिकल कॉलेजचे रुग्णालय गाठले. येतांनाच त्यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस चव्हाण यांना फोनवरून रुग्णालयात येण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी दोन तास केलेल्या पाहणीत अस्वच्छता, अव्यवस्था, कर्मचार्‍यांची मुजोरी, हलगर्जीपणा समोर आला. या वेळी त्यांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना रुग्णालयाच्या व्यवस्थापनासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी आठवड्यातून एक दिवस देण्याबाबत पत्र देण्यास सांगितले. अधिष्ठाताचे शैक्षणिक काम असल्याने दैनंदिन प्रशासकीय काम त्यांच्याकडून अपेक्षित नाही. त्यामुळे रुग्णालयातील खालचे कर्मचारी प्रशासनाची पकड नसल्याचा फायदा घेत कामचुकारपणा करीत आहेत. त्याचा रुग्णालय व रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी आठवड्यातून एक दिवस रुग्णालयाची तपासणी करण्यासाठी वेळ देण्याची त्यांना विनंती केली. त्यासाठी अधिष्ठाता डॉ. खैरे यांना त्यांना रितसर पत्र देण्यास सांगितले. त्याच बरोबर दोन्ही अधिकार्‍यांनी एकमेकांत समन्वय राखण्याचा सल्लाही दिला. जिल्हाधिकार्‍यांनी रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर इमर्जन्सी वॉर्डाबाहेर थांबून ड्यूटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता भोळे यांना बोलावले. तरीही त्या आल्या नाहीत. दोन तास वॉर्डाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी ही बाब अधिष्ठातांच्या लक्षात आणून देत डॉ. भोळे यांना फोन लावून विचारणा करण्यास सांगितले. या वेळी उपस्थित सीएमओंनी फोन लावला असता, जिल्हाधिकार्‍यांनी डॉ. खैरे स्वत: फोनवर बोला असे सांगून जिल्हाधिकार्‍यांनी बोलावून का आल्या नाहीत, हे विचारण्यास सांगितले. या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी ज्यांना काम करायचे नाही, त्यांनी घरी जावे, असा इशारा दिला.

जिल्हाधिकार्‍यांनी वॉर्ड क्रमांक १, टी.बी. रुम, मेडीसीन वॉर्ड, वॉर्ड क्रमांक ७, वॉर्ड क्रमांक ९, एएनएस वॉर्ड, एआयसीयू अ‍ॅण्ड पीआयसीयू व पीएनसी वॉर्ड, सर्जरी वॉर्ड आदीं वॉर्डंना भेटी देऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधला. उपस्थित वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना यांना अनेक बाबतीत विचारणा केली.

Protected Content