जळगाव, : प्रतिनिधी । माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जि प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांचा राज्य पातळीवर गौरव झाल्याप्रित्यर्थ आज या दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील व महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केला
राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत 2020-21 मध्ये जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी बजावत पुरस्कारांत बाजी मारली, हे कौतुकास्पद आहेच. या अभियानांत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी अभिजित राऊत व सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेला सन्मान जळगाव जिल्ह्यासाठी व पालकमंत्री म्हणून माझ्यासाठीही अभिमानास्पदच बाब आहे. या पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील सर्वच प्रशासकीय अधिकार्यांनी एकदिलाने झोकून देत कार्य केल्यानेच हा जिल्ह्याला बहुमान मिळाला. त्यामुळे जिल्हाधिकारी राऊत व जिल्हा परिषद सीईओ डॉ.पाटील यांचा आजचा जिल्ह्याच्या वतीने होत असलेला सत्कार खर्या अर्थाने कुटुंबाकडूनच होत असलेला सन्मान आहे.ही ऊर्जा आपणा दोन्ही अधिकार्यांना पुढील कार्यकाळासाठी नक्कीच फलदायी ठरेल, अशी शुभेच्छा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज त्यांना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्सिंग हॉलमध्ये पार पडलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
महापौर जयश्री सुनील महाजन, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शासकीय वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, महापालिका पर्यावरण विभागाचे दिघे, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक नितीन बरडे, प्रशांत नाईक, विराज कावडिया, अमित जगताप यांच्यासह निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसीलदार नामदेवराव पाटील व प्रशासनातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा राज्य पातळीवरचा सन्मान म्हणजे जिल्ह्यातील प्रशासन व पदाधिकार्यांमधील उत्कृष्ट समन्वयाचे फळ आहे. अडीच-तीन वर्षांत जिल्हा प्रशासनातील कोणत्याही अधिकार्यासमवेत अरेरावी झालेली नाही. त्याचे कारण सर्वच मंडळी चांगले काम करीत आहे. त्याचाच भाग म्हणून ‘कोविड-19’च्या थैमानात देशातील पहिल्या दहामध्ये असलेले जळगाव आता सर्वांत कमी पॉझिटिव्हिटी दर असलेला जिल्हा बनला आहे, ही बाब निश्चितपणे आनंददायी आहे. मी पालकमंत्री नात्याने या कार्यक्रमात सर्वांचे अभिनंदन करतो. यावेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याकडून ‘कोविड-19’च्या सद्यःस्थितीविषयी माहिती जाणून घेतली.जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले, की जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून सर्वाधिक चांगले काम करणे, माझे कर्तव्यच आहे. मात्र, शासनाच्या विविध उपक्रमांत सहभाग नोंदवून त्याचे वेगळेपण ठरणारे मॉडेल निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनातील माझ्या सर्वच सहकारी अधिकार्यांनी झोकून देत ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत 2020-21 साठीचा पुरस्कार खेचून आणला, ही गौरवाची बाब आहे. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे आम्हा सर्व टीमला मिळालेली खरोखर ऊर्जा मी समजतो. आगामी काळातही आम्ही सर्वजण निश्चितपणे चांगले काम करू. ‘कोविड-19’च्या अनुषंगाने आपल्याला पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यात आलेले यश ही सुद्धा आपली सर्वांची महत्त्वपूर्ण जमेची बाजू म्हणावी लागेल.
सुरवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
https://www.facebook.com/508992935887325/videos/6077573795601119