जळगाव (प्रतिनिधी) ‘आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो, की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’, अशी शपथ आज शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. निमित्त होते, राष्ट्रीय मतदार दिवसाचे.
25 जानेवारी, 1950 हा दिवस भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्त हा दिवस देशात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असा भारत निवडणूक आयोगाचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर दहाव्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पाटोडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे आदि उपस्थित होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. हुलवळे यांनी शपथेचे वाचन केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.