जिनपिंग यांना आता चीनसह स्वपक्षातूनही विरोध; अनियंत्रित सत्तेचे खापर फोडणारी टीका

बीजिंग वृत्तसंस्था । कोरोनामुळे अनेक देशांनी चीनचा विरोध करण्यास सुरूवात केली आहे. गलावान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारतातही चीनविरोधी भावना जोर धरू लागली होती. या विषाणूच्या प्रसारावरून अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासारख्या देशांनीही चीनला जबाबदार धरले होते.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना आता त्याच्या देशातून आणि आपल्याच पक्षातून विरोधाचा सामना करावा लागत आहे. जिनपिंग यांच्या हाती अनियंत्रित सत्ता असल्यानं चीन जगाचा शत्रू बनल्याचा आरोप सेंट्रल पार्टी स्कूलमधून निलंबित करण्यात आलेल्या प्राध्यापक कायी शिया यांनी केला.

चीनमधील धनवान आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या सेंट्रल पार्टी स्कूलच्या माजी प्राध्यापक कायी शिया यांनी जिनपिंग यांच्यावर आरोप केले आहेत. “त्यांची धोरणं देशाचा सर्वनाश करत आहेत,” असं त्या म्हणाल्या. चीनचे राष्ट्राध्यक्ष हे सेंट्रल पार्टी स्कूलचे अध्यक्ष असतात. अशा परिस्थिती कायी शिया यांची टीका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

टीकेनंतर निलंबन
जिनपिंग यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सोमवारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीननं कायी शिया यांना निलंबित केलं आहे. यामागे एक कथित ऑडियो रकॉर्डिंग असल्याचं म्हटलं जात आहे. यातील आवाज हा कायी शिया यांचा असून त्यांनी त्यात जिनपिंग यांच्यावर टीका केली आहे.

चीन सोडण्यास भाग पडलं
कायी शिया यांनी सुरक्षेच्या कारणास्तव चीन सोडलं आहे. त्यांच्या टीकेमुळे देशाच्या प्रतीमेला नुकसान पोहोचलं असून त्यामुळे गंभीर राजकीय समस्याही निर्माण झाल्याचं सेंट्रल पार्टी स्कूलकडून सांगण्यात आलं. “चीनमधून बाहेर पडून आपण खुश आहोत. शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात चीनच्या प्रगतीची ताकद उरली नाही. हे लोकं चीनच्या विकासात अडसर बनले आहेत. केवळ मीच नाही असे अनेक लोकं आहेत ज्यांना पक्षातून बाहेर पडायचं आहे. आमचं मत मांडण्यासाठी पर्याय उपलब्ध नव्हता तेव्हाच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता,” अशी माहिती शिया यांनी दिली.

चीन जगाचा शत्रू
सार्वजनिक धोरण तज्ज्ञ असलेल्या कायी शिया यांनी जिनपिंग यांच्यावर आरोप करत त्यांच्या धोरणांमुळेच चीन जगाचा शत्रू बनल्याचं म्हटलं. कम्युनिस्ट पक्षात अनेक नाराज लोकं आहेत. परंतु कारवाईच्या भीतीनं कोणीही बोलत नसल्याचा दावा त्यांनी केला.

सर्व निर्णय जिनपिंग घेतात
जिनपिंग हेच सर्व निर्णय घेत असून त्यात आता चुका या अनिवार्य घटक झाला असल्याचं सांगत त्यांनी करोना विषाणूच्या प्रादुर्भावबद्दलही माहिती दिली. जिनपिंग यांना ७ जानेवारी रोजीच कोरोना प्रादुर्भावाबद्दल माहिती मिळाली होती. परंतु त्यांनी २० जानेवारी रोजी याबाबत सार्वजनिक घोषणा केली. ७ जानेवारी रोजी माहिती मिळाली असतानाच त्यांनी २० जानेवारीपर्यंत वाट का पाहिली? असा सवालही शिया यांनी केला.

 

Protected Content